जगभरातील नागरिकांना मागील काही वर्षांपासुन विविध नैसर्गीक आपत्तींना तोंड दयावे लागत आहे. त्यामध्ये कधी एकीकडे महापूर तर दुसरीकडे दुष्काळ, भूकंप, भूस्खलन, तापमानवाढ इत्यादी नैसर्गिक आपत्तींचा समावेश होतो. हे सगळं होण्यामागे निसर्गाबरोबरच मानवनिर्मित कारणे देखील तितकीच जबाबदार आहेत. आता हल्लीच येऊन गेलेले चक्रीवादळ (cyclone) ‘तौक्ते’ यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांची काय दुर्दशा झाली हे तुम्हांला माहित असेलच. यामुळे झालेले नुकसान लवकर भरून निघेल याची शक्यता फारच कमी आहे. तर असं हे वादळ निर्माण तरी कसं होत? त्याला नाव कोण देतं? अशा विविध प्रश्नांची उत्तरे या लेखात पाहू या.
चक्रीवादळ म्हणजे काय?
समुद्रात एखाद्या ठिकाणी तयार झालेला कमी दाबाचा पट्टा भरून काढण्यासाठी त्या दिशेने चहु बाजूनी वारे वाहू लागतात. यालाच ‘चक्रीवादळ’ म्हणतात.
वादळ आणि चक्रीवादळ एकच आहे का?
नाही. कारण जमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यास वादळाची (storm) निर्मिती होते. आणि हा पट्टा समुद्रात तयार झालास चक्रीवादळाची (cyclone) निर्मिती होते. पण, सामान्यत: आपण वादळच म्हणतो.
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते?
- समुद्रात एखाद्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यास त्याजागी एक पोकळी तयार होते. ही पोकळी भरून काढण्यासाठी आजूबाजूच्या जास्त दाब असलेल्या भागाकडील वारे हे कमी दाबाच्या भागाकडे वाहू लागतात. व वाऱ्याचा वेग वाढल्यास त्या ठिकाणी हवेमध्ये भोवरा तयार होतो आणि चक्रीवादळाची निर्मिती होते.
- चक्रीवादळाची निर्मिती होण्यास इतर घटकांबरोबर समुद्राचे तापमानही तितकेच जबाबदार आहे. समुद्राच्या ज्या भागात 26 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असते त्या भागात वादळं निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो कि, जागतिक तापमानवाढ चक्रीवादळ निर्माण होण्यास हातभार लावत आहे.
समुद्रात तापमानवाढ का होते? हे कंमेंट बॉक्समध्ये जरुर नोंदवा.
चक्रीवादळ हे नेहमीच कमी दाब असलेल्या भागाकडे सरकत असते. पण, जेव्हा हे वादळ जमिनीवर धडकते तेव्हा त्याची तीव्रता कमी होते. कारण एकदा ते धडकल्यावर त्याला होणाऱ्या आद्र हवेचा पुरवठा थांबतो. परंतु, धडकलेल्या ठिकाणी फार मोठं नुकसान होते व वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतो.
चक्रीवादळाची दिशा कशावरून ठरते?
जशी पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला आपण ‘परिवलन’ म्हणतो. तर हे परिवलन आणि वाऱ्याची दिशा यावर चक्रीवादळाची दिशा ठरत असते. वादळाची निर्मिती कुठे-केव्हा होईल हे अचूकपने सांगता येत नाही. मात्र, त्याचा अंदाज घेऊ शकतो.
टायफून, हरिकेन आणि चक्रीवादळ हे तिन्ही वेगळे आहेत का?
नाही. टायफून (typhoon), हरिकेन (hurricane) आणि चक्रीवादळ (cyclone) ही तिन्ही वादळांची नावे असून त्यांना महासागरानुसार विविध नावानी ओळखले जाते. ते पुढीलप्रमाणे:
महासागर | चक्रीवादळाचे नाव |
---|---|
हिंदी | चक्रीवादळ |
अटलांटिक | हरिकेन |
प्रशांत | टायफून |
जगभरातील वादळांना नावे कोणामार्फत दिली जातात?
हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेलच. जागतिक हवामान संस्थेने (WMO) सन 1953 पासून जगभरात येणाऱ्या काही ठिकाणच्या वादळांना नावे देण्यास सुरुवात केली होती. परंतु, आशिया खंडामध्ये येणाऱ्या वादळांना नावे देण्यास WMO ने सन 2000 पासून सुरुवात केली. नागरीकांना हवामान व वैज्ञानिकांना संबधीत वादळाचा डेटा उपलब्ध व्हावा यामुळेच येणाऱ्या वादळांना नावे देण्याची पद्धत सुरु केली गेली.
परंतु, 2004 पासून WMO मार्फत येणाऱ्या वादळांना नावे दिली जात नाहीत. कारण WMO मार्फत दिलेली नावे ही खूप अवघड होती आणि पटकन लक्षात राहत नव्हती. त्यामुळेच परिचित असं नाव दिल्यास ते नागरिकांच्या पटकन लक्षातही राहील. या उद्देशाने सन 2004 मध्ये महासागरानुसार आसपासच्या देशांचे विविध गट तयार करण्यात आले. आपला भारत देश हिंदी महासागरात असणाऱ्या देशांच्या यादीत मोडतो. सुरुवातीला या यादीत एकूण 8 देशांचा समावेश होता. परंतु, 8 देशांनी प्रत्येकी दिलेली 8 नावे संपल्यामुळे 2018 साली या यादिमध्ये अजून 5 देशांचा समावेश करण्यात आला. अशा एकूण 13 देशांनी प्रत्येकी 13 नावे दिली आहेत. भारताने दिलेली 13 नावे पुढीलप्रमाणे : गती, तेज, मुरासू, आग, व्योम, जहर, प्रोबाहो, नीर, प्रभंजन, गुरूनी, अंबुद, जलाधी, वेग इत्यादी.
तुम्हांला हा लेख कसा वाटला ते कंमेंट बॉक्समध्ये कंमेंट करून जरुर सांगा.